हत्तीच्या हल्ल्यात शेतकर्‍याचा मृत्यू   

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात फणसाची शेती केली जात असते. या दिवसांत फणस काढणीला सुरुवात झाली आहे. त्यानुसार सकाळच्या सुमारास फणस काढण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यावर टस्कर हत्तीने मागून हल्ला केला. यात ७० वर्षीय शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी समोर आली आहे. यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. 
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले परिसरात पहाटे सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. यात लक्ष्मण गवस (वय ७०) असे मृत झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. दरम्यान, लक्ष्मण गवस हे त्यांच्या काजू व फणसाच्या बागेत गेले होते. तेथे काजू गोळा करत असताना गवस यांच्यावर हत्तीने मागून हल्ला केला. या हल्ल्यात गवस यांना हत्तीने पायाखाली चिरडले यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हत्तींचा हा जीवघेणा उपद्रव थांबविण्यात वन विभाग व राज्यकर्ते आता तरी डोळे उघडणार आहेत का? असा प्रश्न दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी वर्गातून उपस्थित केला. 

Related Articles